भुगांव : पुणे ते कोलाड महामार्गाचे काम मुळशीत विविध गावामध्ये अत्यंत संथ गतीने सुरू असून संबंधित काम करणारे कंत्राटदार मनमानीपद्धतीने काम करत आहेत. ते लोकप्रतिनिधींना ही जुमानत नाहीत. भुगाव येथील छत्रपती जलाशय ते रामनदी पर्यंतच्या रस्त्यावर विविध ठिकाणी काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होते. तसेच वारंवार अपघाताच्याही घटना घडतात. सदर कामाबाबत लोकप्रतिनिधी ,प्रशासन व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात निवेदने देऊनही काम मार्गी लागत नाही या कामाबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वतः लक्ष घालून एमएसआरडीच्या अधिकारी व कंत्राटदार असलेल्या रोडवेज कंपणीचे प्रतिनिधीना सूचना कराव्यात असे निवेदन भुगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता सणस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश देशमुख यांची भेट घेऊन दिले.
यावेळी भुगाव ग्रामपंचायत उपसरपंच अर्चना सुर्वे, विशाल भिलारे मा.उपसरपंच, वैशाली सणस मा.उपसरपंच, सदस्य कालिदास शेडगे,वनिता तांगडे ,पत्रकार विनोद माझिरे ,प्रदीप पाटील यांच्या शिष्टमंडळानेही राजेश देशमुख यांच्यासमोर पुणे कोलाड रस्त्याच्या कामातील त्रुटींबाबत संवाद साधला.
ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या निवेदनात आवश्यक त्या वळण ठिकाणी रिफलेक्टर लावणे, गावठाण हद्दीत दुभाजक बसविणे,अपूर्ण ठिकाणी डांबरीकरण करून रबरी गतिरोधक बसविणे, बाह्यवळण मार्गाचे काम सुरू करणे अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच संबंधित कामाबाबत रोडवेज कंपनीने लक्ष न घातल्यास भुगाव ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांनी तातडीने एमएसआरडीसीचे अधिकारी संदीप पाटील व रोडवेजचे अधिकारी वसईकर यांना तात्काळ फोन करून ग्रामपंचयातीच्या पदाधिकाऱ्याबरोबर मीटिंग करून या रस्त्याच्या समस्या समजून घेण्याबाबत सूचना केल्या.