पौड : राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदान तोफ आणि जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी अखेर आज शिवजंयतीचा मुहुर्त साधत युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंञी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येरवडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला आहे. संपर्क प्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर व जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या माध्यमातून शंकर मांडेकर यांचा प्रवेश झाला.
गेले दोन ते तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला मान मिळत नाही यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमापासून शंकर मांडेकर दूर राहिलेले होते. ते लावत असलेल्या त्यांच्या फ्लेक्सवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या फोटोचा वापर करणे त्यांनी बंद केला होता. बावधन आणि पिरंगूट जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा उमेदवार थोड्या मताने दोन ते तीन निवडणूकांमध्ये पराभूत झाला आहे. हे त्यांनी हेरले होते. माजी सभापती बाळासाहेब पवळे यांच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघावर लक्ष ठेवून काही दिवसांपासून याभागात दौरे वाढविले होते.
शंकर मांडेकर यांच्या वकृत्वशैलीमुळे मुळशी तालुक्यात तरूणामध्ये त्यांची मोठी क्रेस आहे. विधानसभेला आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून या निवडणूकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शंकर मांडेकर शिवसैनिकाच्या मदतीने राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीला लागलेले दिसत आहेत.शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असताना संघटना तालुक्यात गावोगावी वाढविली. माण हिंजवडी गटातून ते निवडून आले होते. शंकर मांडेकर यांच्या पत्नी सारिका मांडेकर या सुध्दा पंचायत समितीच्या उपसभापती पदावर काम केलेले असून शंकर मांडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची मुळशी आधीच मोठी असलेली ताकद दुप्पट वाढलेली असून शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्यांच्या समवेत वातुंडेचे सरपंच सरपंच अमोल शिंदे, चांदेचे उपसरपंच गणेश मांडेकर,घोटावडेचे माजी सरपंच संदीप खानेकर, सुखदेव मांडेकर व अनेक जणांनी सेनेत प्रवेश केला.