logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी घोडेदौड कायम : पीएमआरडीए नंतर पीडीसीसीवर विजयी झेंडा


पौड :  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या  निवडणूकीसाठी मुळशी तालुक्यातून बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आत्माराम कलाटे यांना पराभवाचा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिल चांदेरे विजयी झाले आहेत.सुनिल चांदेरे यांना २७ तर आत्माराम कलाटे यांना १८ मते मिळालेली असून राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी  घोडेदौड मुळशी तालुक्यात कायम राहिली आहे.

         पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ' अ' वर्ग मुळशी मतदार संघातून आत्माराम कलाटे यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. आत्माराम कलाटे यांची मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणावर पकड होती. कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली. तर पक्षाच्या व्यासपीठावरही त्यांना मानाचे स्थान मिळायचे. पाच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणूकीत आत्माराम कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच राजाभाऊ हगवणे यांचा पराभव केला होता. माञ विधानसभेचे वेध लागलेले आत्माराम कलाटे यांनी तीन वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. भोर विधानसभा मतदार संघात असलेली शिवसेनेची ताकद,पैसा आणि नातेगोते यामुळे आपण विजयी होऊ म्हणून कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.तसेच एक वर्षाच्या कालावधीत मुळशी तालुक्यात शिवसेनेत सक्रीय कामही केले. माञ ऐनवेळी विधानसभेला शिवसेनेने कलाटे यांना दिलेला शब्द पाळला नाही. विधानसभेला शिवसेनेकडून उमेदवारी न मिळालेले कलाटे अपक्ष उभे राहिले. माञ या निवडणूकीत त्यांना मानहाणीकारक पराभव पत्कारावा लागला.

        विधानसभा निवडणूकीपासून अलिप्त असलेले कलाटे हे  गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने सक्रिय झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे यांनीही या निवडणूकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून दंड थोपटलेले होते. मुळशी तालुक्यात एकूण ४६ सोसायटी मतदार होत्या.जामगांव सोसायटीने बँक निवडणूकीसाठी प्रतिनिधीच दिलेला नव्हता. त्यामुळे या निवडणूकीत ४५ सोसायटी प्रतिनिधीनी मतदानाचा हक्क बजाविला.

       नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळशी तालुक्यातील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाला.मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल चांदेरे यांनी या निवडणूकीत बाजी मारली.

add image
add image

Leave Comments

Top