पौड : मुळशी तालुक्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या अग्निशामक दलास युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर अखेर हिरवा कंदील मिळाल्यामुळे मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुळशी तालुक्याचे झपाट्याने वाढत असलेले नागरीकरण, तालुक्याचे मोठया प्रमाणात होत असलेले शहरीकरण तसेच येथे असलेल्या मोठ्या उद्योगांमुळे तालुक्याला स्वतंत्र अग्निशामक दल असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि औद्योगिक समूहांकडून होत होती. गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीच्या दुर्घटना घडून मोटग्या प्रमाणात नुकसानीच्या घटना झालेल्या असून नुकत्याच झालेल्या उरवडे येथील एसव्हीएस अँक्वा कंपनीत १७ कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. अशा दुर्घटनेच्यावेळी मुळशी तालुक्याच्या बाहेरून अग्निशामक दलाच्या वाहनास येण्यास खूप उशीर होतो आणि दुर्घटनेची तीव्रता देखील त्यामुळे वाढल्याचे पाहायला मिळते.
अशावेळी तालुक्याला स्वतःचे अग्निशामक दल असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याची दखल घेऊन युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांनी सदर बाबीसाठी मागील काही महिन्यांपासून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सदरची जागा पुणे जिल्ह्याच्या विकास आराखड्यात भरे या ठिकाणी अग्निशामक दलासाठी आरक्षित करून घेतली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि मुळशीचे तहसिलदार अभय यांच्याशी चर्चेतून सदर जागा कासरआंबोली येथे प्रस्तावित करून घेण्यात आली असून तिचा प्रत्यक्ष ताबाही पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यात आला आहे. प्रस्तावित जागेची मागणी आणि ताबा लवकर मिळण्यासाठी युवासेनेतर्फे अविनाश बलकवडे यांनी गेल्या जवळपास वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदरील जागा पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाली असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आले.
ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल युवासेनेचे पुणे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांची भेट घेऊन त्याचे आभार मानून सत्कार केला. यावेळी तालुका समन्वयक हनुमंत सुर्वे, उपतालुकाप्रमुख मोहन शिंदे, शिवाजी बलकवडे, मयूर रानवडे आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची मागणी प्रलंबित होती. गेल्या काही महिन्यात झालेल्या अपघाताच्या घटना आणि त्यात मोठया प्रमाणात झालेली जीवितहानी पाहता याची गरज अधोरेखित झाली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून हे काम पूर्ण झाले असून प्रशासकीय स्तरावर पुणे जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख,मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
अविनाश बलकवडे
युवासेना पुणे जिल्हा अधिकारी