पौड : मुळशी तालुक्यातील आदिवासी कातकरी बांधवांचे आधारकार्ड काढण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी पुढाकार घेतला असून कोळवण, आंबवणे,वांद्रे तसेच इतर ठिकाणी आधारकार्ड काढण्याचे काम सुरू झाले आहे.
आधारकार्डमुळे कातकरी बांधवांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोइस्कर होणार आहे.तालुक्यातील प्रत्येक गावाबाहेर तसेच रानात आदिवासी कातकरी समाज वास्तव्यास आहे.शिक्षणाच्या प्रवाहात न आल्याने कष्ट करून त्यांना उपजिविका करावी लागते. अनेक कुटुंबांना जातीचे दाखलेही अद्याप मिळालेले नाहीत.आधारकार्ड अभावी सरकारी खावटी योजने व इतर सरकारी योजनापासून ते दूर राहिलेले आहेत.त्यामुळे या समाजातील नागरिकांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी अमित कंधारे यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर व तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच व इतर कार्यकर्ते सरकारी यंञणेच्या सहकार्याने गावात जाऊन कातकरी बांधवांना बोलावून संगणकावर आधारकार्डसाठी लागणारी सर्व कार्यवाही पूर्ण करताना दिसत आहेत.